Friday 12 April 2013



.... आणि एकलव्याने आपला अंगठा कापून द्रोणाचार्यांच्या पायावर ठेवला. गोष्टीतलं शेवटचं वाक्यही संपलं. 
खरंतर आतापर्यंत त्यानं झोपायला पाहिजे. 
एरवी गोष्ट संपण्याच्या आतच तो झोपतो. पण आज तो लक्षपूर्वक ऐकत होता. मी थांबलेलो पाहताच तो उठून बसला आणि  विचारलं, “तातू, द्रोणाचार्यांनी चीटींग केली ना ? मग ते सगळ्यात चांगले टीचर कसे ?” 

मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. कशीबशी त्याची समजूत काढत म्हणालो, “अरे त्यांची काहीतरी मजबुरी होती ना. “
पण त्याला ते पटलं नाही. तो पुन्हा म्हणाला, “पण एकलव्याने अंगठा कापला तेंव्हा त्याला किती दुखलं असेल, रक्तपण आलं असेल ना. काल माझ्या मित्राला एकदा खेळताना लागलं होतं तर सगळे टीचर पळत आलेले . द्रोणाचार्यांनी एकलव्याच्या जखमेवर औषध पण लावलं नाही.” 



“हं, तसं झालं खरं. “
“आणि तातू, अर्जुन तर राजकुमार होता ना ?”
“होय”
“आणि एकलव्य शिकाऱ्याचा मुलगा ?”
“होय.”
“मग तर द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घ्यायलाच नको होता. त्याला धनुष्य-बाण कसं चालवता येईल ?”
“अरे, पण त्यानं नंतर प्रॅक्टीस केलीच ना.”
असं होय. त्याचं समाधान झालेलं दिसलं.
झोप रे आता. सकाळी शाळेत जायचंय ? मी थोडा आवाज चढवला तसा तो पुन्हा माझ्या कुशीत शिरला. डोळ्यावर झोप चढली, तशा अर्धवट झोपेतही तो पुन्हा म्हणाला, “तातू एकलव्याला दवाखान्यात घेऊन जायचं का हो आपण ? “
 

कुत्रं विकत घेतात ?

सोसायटीच्या गेटजवळ एका भटक्या कुत्रीनं चार गोंडस पिल्लांना जन्म दिलाय.शेजारच्या मोठ्या बिल्डींगच्या आठव्या मजल्यावरील गॅलरीत बांधलेला एक मोठा कुत्रा त्या चौघांच्या मस्तीकडे असूयेनं पाहत असतो. अगदीच अनावर झालं की तिथूनच तो त्यांच्यावर भुंकतो देखील. रोज सकाळी शाळेला घेऊन जाणारी बस येईपर्यंत त्या चिमुकल्या चौकडीसोबत आम्हा बापलेकांची मस्ती चालू असते. 
त्यानं आज विचारलं. 

तातू, आपणही कुत्र्याचं पिल्लू पाळायचं का ? हा प्रश्न अपेक्षित होताच. त्यामुळे मीपण उत्तर दिलं. जरुर पाळूयात पण चांगलं कुत्र पाळण्यासाठी त्याला तसं सांभाळावं पण लागतं. महाग असतात ती पिल्ल .
त्यावर त्याला थोडं आश्चर्य वाटलं, महाग ? म्हणजे विकत आणावी लागतात काय कुत्र्याची पिल्ल ? त्या चार पिल्लांकडे बोट दाखवून त्यानं विचारलं, मग या पिल्लांची किंमत किती ?
अरे भटक्या कुत्र्यांची किंमत नसते रे, मी म्हणालो. 


यावर तो स्तब्ध झाला. शाळेची बसही आली होती. बसमध्ये बसून तो शाळेला गेला. दुपारी परत नेण्यासाठी मलाच जावं लागलं. धुळीनं माखलेला, प्रचंड मस्ती केल्याच्या खुणा शर्टावर... तो गाडीतून खाली उतरला. घराकडे जाताना त्यानं पिल्लांकडं पाहिलं आणि पुन्हा विचारलं, पण तातू, जीवंत कुत्र्याच्या पिल्लाला विकत घ्यायला पैसे का बरं द्यावे लागतात. आणि या छान-छान पिल्लांना लोक पाळत नाहीत.
मी काय उत्तर द्यावं असा विचार करत असताना त्यानं पुढचा बॉम्ब टाकला. मग तातू जीवंत असणारी पिल्लं माणसं विकत घेत असतील तर मग माणसाची लेकरं पण विकत मिळतात का ? तुम्ही पण मला विकतच आणलंय ?
मी काय बोलणार.... अखेर आजपासून ती चारही पिल्लं त्यांच्या आईसकट आम्ही दत्तक घेतली आहेत.